Tuesday, July 7, 2020

नांदेडात 200 खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड/ प्रतिनिधी


 नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.

कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.

सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे. 

No comments:

Post a Comment

नांदेडात 200 खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

नांदेड/ प्रतिनिधी  नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय ...