धरण उशाला कोरडं घशाला; कंधार-लोहा तहानलेलाच
माळाकोळी/ प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणाचे पाणी स्थानिकांना सोडून लातूर जिल्ह्यातील उदगीर व परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील अनेक गांवाना देण्याचा निर्णय झाल्याने यंदाच्या निवडूकीत सर्वच राजकीय पक्षांनी लिंबोटी धरणाचा मुद्दा उपस्थित केला.
लिंबोटी धरणामुळे विस्थापित झालेल्या गावांचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. गौडगाव, रुई, आंडगा गावांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत.लिंबोटी धरण म्हटले की वाद आलाच. भलेही परस्पर जिल्ह्यातील असो की कंधार-लोहा मतदार संघातील राजकीय नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत लिंबोटी धरण नेहमी राज्यात चर्चिल्या जाते.
दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन झाले होते. धरणामुळे विस्थापित झालेल्या गावातील समस्या कायम आहेत. गेली तीस वर्षे विस्थापितांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत.
तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते 1985 मध्ये मानार नदीवर ऊर्ध्व मानार प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ झाला. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च त्यावेळी 50 कोटी रुपये होता; पण प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होण्यास 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पामुळे लोहा तालुक्यातील 6 हजार हेक्टर आणि अहमदपूर (जि. लातूर) तालुक्यातील तीन हजार हेक्टर जमिनीच्या सिंचनाची सोय होणार आहे. धरणासाठी लिंबोटी, डोंगरगाव, आंडगा, घोटका, रुई गावातील लोकांनी जमिनी दिल्या आहेत. या प्रकल्पाचे उदधाटन अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे जलपूजन झाले.अहमदपूर तालुक्यातील शेतकरी उपसा जलसिंचनाद्वारे शेतीला पाणी घेत आहेत. मात्र, लोहा तालुक्यात धरण असूनही या तालुक्यातील शेतक-यांना अद्याप धरणाचा फायदा होत नाही.विलंबच विलंब धरणाचे भूमिपूजन होऊन सव्वीस वर्षे होत आहेत. तेव्हापासून या धरणाचे भिजत घोंगडे पडले आहे. 500 कोटी रुपये खर्चूनही या धरणाचा फायदा अद्याप शेतक-यांना होत नाही. परंतु या धरणाच्या नावावर राजकीय नेते चांगलीच पोळी भाजुन घेतांना दिसत आहे.